रामायण महाभारत तसेच पौराणिक ग्रंथामध्ये नर्मदा नदीचे वर्णन केलेले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदु धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारीका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा पारिक्रमा केली अशी धारणा आहे. मार्कंडेय हे नर्मदा परीक्रमेचे आदय प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापुर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्टय असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटावर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नदयांचे धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीला उगम वळसा घालुन मार्गक्रमण केले. अश्या पुर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली. स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात. पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पुर्ण होते असा समज आहे. यासाठी एकुण २६०० किमी. अंतर पायी चालावे लागते. गंगा यमुना गोदावरी आणि कावेरी प्रमाणेच नर्मदा नदी हिंदु धर्मात पवित्र मानली जाते. उगमापासुन ते मुखापर्यंत नदीकाठी अनेक तीर्थ क्षेत्रे वसलेली असल्याने नर्मदा प्रदक्षिणेला हिंदु धर्मात महत्व प्राप्त झाले आहे यास नर्मदा परिक्रमा असे म्हणतात.
नर्मदा परिक्रमाः नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे. जी पायी पुर्ण करावयाची असते. ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमा वासियांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जाते. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.
ही परिक्रमा पायी पुर्ण करण्याला खुप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैविक अनुभूती फक्त पायी परिक्रमेतच मिळु शकतात. परंतु आत्ताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक ही यात्रा बसने अथवा स्वतःची दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस २१ दिवसांत पुर्ण करतात.
हया भुतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा तर अयोध्या मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा नैमिषारण्य-जनकपुरी परिक्रमा या सर्वाहुन मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची प परिक्रमा जी जवळजवळ ३५०० किमी. आहे. सर्व नदयांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणुन गंगेच महत्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. असे सांगितले जाते की प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषींनी अतिशय खडतर तप म्हणुन पूर्ण केली त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्व आहे. असे म्हणतात कि श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती की त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनदया, ओढे, नाले देखील त्यांच्या प्रवाहातुन पार न करता त्यांच्या उगम अथवा विलया पर्यंत जाऊन तेथुन ते पार केले होते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परिक्रमेनंतर प्रत्येक परिक्रमावासी चे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परिक्रमेचे एकुण अंतर ३५०० किमी आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिकमेचा अवधी वर्ष महिने आणि १३ दिवसाचा आहे, तसेच ही परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पुर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्र मावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौणिमेच्या आसपास परिक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पुर्ण करतात.
नर्मदा मैय्या मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतुन वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातुन तिचा उगम होतो. सातपुड्याच्या अमरकंटक या छोटयाशा गावातुन निघुन बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुदास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्वही खुप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.
नर्मदा परिक्रमा या विषयी माहिती मिळवण्यासाठी मराठी तसेच इतर भाषेत देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मराठी मध्ये 'श्री जगन्नाथ कुंटेजी' यांचे 'नर्मदे हर हर हे पुस्तक खुपच प्रसिध्द आहे. तसेच 'भारती ठाकुरजी' यांचे 'नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा' हे पुस्तक देखिल खुप माहितीपुर्ण आहे. 'दा. वि. जोगळेकर यांचे नर्मदा परिक्रमा हे पुस्तक देखील छान आहे. अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
१. नर्मदा :सुख आणि आनंद देणारी ती नर्मदा तर शिवाचे वरदान प्राप्त असल्यामुळे जी प्रत्येक कल्पात असते ती "न-मृता" म्हणुन "नर्मदा"
2. नर्मदापुजन
3. दक्षिणगंगा : उत्तरेतील गंगेप्रमाणे जी दक्षिणेतील सर्व जीवांचा उध्दार करते म्हणुन ती "दक्षिण गंगा"
4. महती : शंकराच्या वरामुळे जी महापातक नाशिनी नर्मदा घोर अशा महाप्रलय काळात देखील असते अशी जिची महती आहे ती महाकाय नर्मदा "महती" होय
5. शोण : तपस्यारत शिवाच्या त्रिशुलाच्या अग्रभागातुन (किंवा शिवाच्या स्वेदातुन) जे जलबिंदु निर्माण झाले, त्यातुन जी जन्माला आली ती "शोण"
6. कृपा : सर्वांना आशय देणारी, भवसागरात बुडणाऱ्या जीवांवर कृपा करणारी ती "कृपा"
7. मंदाकिनी : पर्वत रांगातील अनेक दिव्य वृक्षांमधुन मंद मंद गमन करणारी ती "मंदिकिनी"
8. महार्णवा : प्रलय काळातील महा जलाशयात देखील जिचं स्वताचं वेगळ अस्तित्व असते म्हणुन ती "महाणवा"
9. रेवा : मोठमोठयाने गर्जना करीत अनेक विशालकाय खडक, डोंगर यांना फोडुन जी पुढे मार्गक्रमण करीत असते ती "रेवा"
10. विपापा : अत्यंत दुःखी शापाने दग्ध असलेल्या जीवांना देखील जी विपाप (पापरहित) करते, ती "विपापा"
11. विपाशा : भवसागरातील अनेक पाशांनी बध्द असलेल्या जिवांची जी पाशमुक्तता करते ती "विपाशा"
12. विमला : निर्मल जल असलेली चंदासारखी विमल, अंधःकारातही महाप्रभा देणारी म्हणुन "विमला"
13. करभा : चंद्राच्या शितल किरणासारखी आणि सुर्याच्या तेजस्वी किरणांसारखी जी विश्वाला प्रसन्न करते ती "करभा"
14. रंजना : जिच्या केवळ दर्शननानेच देव, दानव, ऋषी, साधुसंत आणि समस्त मानवजातीचे रंजन होते ती "रंजना"
15. वायुवाहीनी (बालुवाहीनी) : जी नर्मदा सृष्टीतील तृण, लता, वृक्ष, वनस्पती, किटक, पशु, पक्षी या सर्वांचा उध्दार करून स्वर्गात घेऊन जाते ती "वायुवाहिनी"
॥ शुभं भवतु ॥