dostitour@gmail.com ९५९४८८०१२३ ९५९४४३२७४८ ९७०२२५१५८४ ८८२८२२४१२१. www.dostitour.com

शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा


एक आध्यात्मिक अनुभुती

दोस्ती टूर्स : नाते मैत्रीचे

नर्मदे विषयी

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना जाणीव आपल्या पुर्वसुरींना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्य भावना, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेव अद्वितीय परंपरा आहे "नर्मदा परिक्रमेची"!

शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा हा भारतीय संस्कृतीचा, अस्मितेचा अनमोल ठेवा आहे. परंतु ह्या बाबतीत वस्तुनिष्ठ माहिती सहज उपलब्ध नसल्यामुळे परिक्रमेच्या खडतरपणाचा विनाकारण बाऊ केला जातो. परिक्रमेचे मर्म आणि महात्म्य ह्यांच्याकडे म्हणावे तितके लक्ष न दिल्यामुळे नर्मदा परिक्रमेसाठी निघावे अशी इच्छा मनात बाळगणारे लोक द्विधा मनस्थितीत सापडतात.

शुलपाणीच्या जंगलातील भिल्ल लुटारू ह्या परंपरेमागचे खरे कारण असे की नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमा वासीयांनी मोह, माया, आसक्ती, लोभ यांच्या त्याग करणे अभिप्रेत आहे. पण तो त्याग सहजासहजी घडत नसल्यामुळे हा धडा गिरवण्याची नर्मदेच्या तटी अशी “सोय” केली असावी.

नर्मदा परिक्रमेची फलश्रुती परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीमध्ये होणारे आमूलाग्र परिवर्तन, मनाचे उन्न्यन व सबलीकरण, निर्मलीकरण, साधल गेल्याने त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक दोषांच निर्मुलन होऊन स्वस्थ शरीर, शांत स्थिर आणि संतोषी वृत्ती प्राप्त होणे अशी असली तरी ह्या वाटेने चालून प्राप्त होणारे उपलाभ सुद्धा काही कमी मोलाचे नाहीत.

नर्मदा परिक्रमेचे एक अपूर्व वैशिष्ट्य असे आहे की नर्मदा परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती केवळ धार्मिक किंवा सामाजिक दृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावरसुद्धा समान पातळीवरची मानली जाते. नर्मदा परिक्रमा करणारी व्यक्ती ती कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्तरावर असो तिने अत्यावश्यक किमान गरजांची पूर्तता होईल एवढेच धन वा साधन सामग्री परिक्रमे दरम्यान सोबत बाळगावी अनावश्यक संग्रह करू नये असा दंडक आहे.

आपला वेगळेपणा, मोठेपणा लोकांच्या ध्यानात यावा असे वाटणे नर्मदा परिक्रमेतील अभिप्रेत नाही. परिक्रमेच्या मार्गावर श्रीमंत–गरीब, लहान–मोठा असा भेदभाव नाही. आपण प्रत्यक्ष अनुभवतो तो म्हणजे समानता, एकात्मतेचा अनुभव. नर्मदा परिक्रमेतील ‘समभावाचा तत्त्व स्वःत आचरणात आणण्याचा आहे.

नर्मदे हर !! नर्मदे हर !!

नर्मदा पूजन

नर्मदा माता ही कुमारी होती अशी श्रद्धा आहे. नर्मदा परिक्रमा करताना श्रद्धेने भक्तांना तिचे कुमारिका स्वरूप दर्शन दिल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर कन्यापूजन केले जाते. हे कन्यापूजन करताना परिसरातील ८ वर्षांखालील मुली — बालवाडी, पहिली, दुसरीच्या मुली — बोलावून त्यांचे पूजन केले जाते. त्यांना हळदकुंकू लावून त्या वयाच्या मुलींना आवडणाऱ्या आणि उपयोगी वस्तू भेट दिल्या जातात.

अधिक माहिती पहा

पायी नर्मदा परिक्रमेचे नियम

पायी नर्मदा परिक्रमेचे नियम ही परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. नर्मदा परिक्रमा कोणी, कधी, कोणत्या वयात, कशी आणि कशासाठी करावी? — नर्मदा परिक्रमा कोणीही करू शकतो. त्यासाठी जन्मजात वंश, जात, धर्म, लिंगभेद किंवा वय यांची अजिबात अडचण नाही.

अधिक माहिती पहा

नर्मदा परिक्रमेचे धार्मिक महत्व

रामायण महाभारत तसेच पौराणिक ग्रंथामध्ये नर्मदा नदीचे वर्णन केलेले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदु धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारीका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा पारिक्रमा केली अशी धारणा आहे.

अधिक माहिती पहा

शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा – १८ दिवस

दिवस १ : मुंबई / पुणे ते उज्जैन रेल्वे प्रवास.

दिवस २ : सकाळी उज्जैन येथे आगमन, महांकाळेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शन, पूजन, स्थानिक स्थळ दर्शन व मुक्काम.

दिवस ३ : सकाळी इंदौर स्थळ दर्शन, ओंकारेश्वरकडे प्रयाण व मुक्काम.

अधिक माहिती पहा

परिक्रमा मार्ग व नकाशे

नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत क्रमाने लागणारी गावे : बहुतेक गावे मध्य प्रदेश राज्यातील आहेत. ओंकारेश्वर – राजघाट – प्रकाशा - गोरागाव – भालोद - अंकलेश्वर – कठपुर – मिठीतलाई - भडोच -मोटी – कोरल – नारेश्वर - तिलकवाडा- कोटेश्वर – गरुडेश्वर – मांडु – सहस्त्रधारा – महेश्वर – मंडलेश्वर – बडवाह – नेमावर – बरेली – बरमनघाट - जबलपुरचा गौरी घाट- अमरकंटक – हौशंगाबाद - ओंकारेश्वर.

अधिक माहिती पहा

स्थान महात्म्य

ओंकारेश्वर - बडवाणी - कटपोर - बलबला तीर्थ - मांडवगड - महेश्वर - मंडलेश्वर - नेमावर - बर्मनघाट (ब्रम्हांड घाट) - अमरकंटक - होशंगाबाद

अधिक माहिती पहा

स्थान महात्म्य

ओंकारेश्वर

ओंकारेश्वर येथून परिक्रमेचा श्रीगणेशा होतो. ओंकारेश्वर हे नर्मदेवरील अतीव निसर्गरम्य स्थान आहे. येथे नर्मदा मैय्याचा प्रवाह जोरदार आहे. येथे नर्मदेचा प्रवाह दुभंगूम मध्येच एक बेट नि र्माण झाले आहे. उत्तरेकडील प्रवाह कावेरी तर दक्षिणेकडील प्रवाह नर्मदा म्हणूनच ओळखला जातो. या प्रवाहावर दोन सेतू उभारले आहेत. याच बेटावर डोंगरपायथ्याला ओंकारेश्वरचे मंदिर आहे आणि वरच्या बाजूला येथील राजवंशाचा देखणा महाल आहे. या बेटावर एक ८ कि. मी. ची परिक्रमा आहे. पश्चिमेला वाटचाल सुरु केल्यावर सुमारे ३ कि. मी. वर नर्मदा कावेरीचा (दक्षिण भारतातील कावेरी वेगळी आहे. संगम आहे. थोडेसेच धाडस करून जलतरणाची मजा लुटता येते. पुढील वाटचालीत आपल्याला काही प्राचीन सुंदर मंदिरे आढळतात तसेच अनेक मोठमोठे दरवाजेही लागतात, उंची वरून नर्मदेचे विहंगम दर्शनही मन तृप्त करते.

पूर्वेस नदीवरील भव्य बंधाराही निरखता येतो. येथे वेगवान प्रवाहात नौकाविहाराचा आनंद हि लुटता येतो. अप्रतिम कोरीव काम असलेल्या प्राचीन ज्योर्तिलिंग मंदिरात परिक्रमा करणाऱ्यांना नर्मदा अथवा तिचा उपप्रवाह कोठेही ओलांडता येत नाही.

बडवाणी

बडवाणी येथे राजघाट आहे. येथे विशाल नर्मदापात्र लोभस आहे. येथून पुढील काही भागांत मगरींचे वास्तव्य आहे, मगर हे नर्मदात्मातेचे वाहन आहे. येथून पुढे सुप्रसिध्द शूलपाणीचे जंगल सुरू होते. येथे आदिवासी भिल्लांची वस्ती आहे. परिक्रमावासियांना ते लुटतात. या भिल्लांना येथे मामा संबोधतात, यांना रेवामातेचे भाऊ मानतात आणि त्यांच्याकडून लूटले गेल्याशिवाय परिक्रमेचे सार्थक नाही. पण सड़क या अरण्याच्या बाहेरून जात असल्याने आपण या अनुभवाला मुकतो.

कटपोर

यानंतर गुजरातमध्ये प्रवेश होतो. यानंतर आपण कटपोर येथे पोहचतो. जलप्रवास बहुधा मध्यरात्रीनंतरच पहाटे असतो, नौकेत दिवा नाही. मैयाच्या भरवशावरच सागर पार करावयाचा. मिठीतलाई येथे किनारा लाभला की नर्मदा मैयाचा मनापासून जयजयकार करा. होडीतून उतरून जमिनिवरजातो. सुमारे दिड कि. मी गुडघाभर दलदलीतून जावे लागते. पुढे भडोच नारेश्वर टेंबेस्वामीचे समाधिस्थळ गरुडेश्वर मार्गे सरदार सरोवर पाहतो. विंध्य आणि सातपुडा दोन्ही पर्वतरांगा येथुन दिसतात,

या प्रकल्पाविषयी वाद काहीही असोत, पण हे अमर्याद पाणी जे सागरात वाया जात होते ते गुजरातच्या अहमदाबाद‌पासून कच्छच्या रणापर्यंतच्या भूभागाची तहान भागवत आहे हे खरे!

बलबला तीर्थ

नर्मदा परिक्रमेतील एक महत्वाचे तीर्थ येथे एक कुंड आहे. आपण जर या कुंडच्या बाजुला उभे राहुन जर नर्मदे हर किंवा हर हर महादेव असा जोरजोरात जयजयकार केला तर त्या कुंडाच्या पाण्यात भराभर मोठे मोठे बुडबुडे किंवा बलबले यायला सुरुवात होते, याची आख्यायिका अशी आहे की रावणाच्या काळातील एक बलबला नावाचं राक्षसाने याच परिसरात नुसता हाहाकार माजविला होता सामान्य जनता त्याच्या त्रासाला कंटाळली होती तेव्हा सर्व भक्तजनांनी नर्मदेमातेला याच्यापासुन सुटका मिळावी म्हणुन विनव णी केली.

तेव्हा नर्मदा मातेने या बलबला राक्षसाशी युध्द केले व त्याला याच ठिकाणी गाठले त्यामुळे अजुनही तो राक्षस नर्मदे मातेचे अथवा शिव शंकराचे नाव ऐकताच घाबरतो असे म्हणतात.

मांडवगड

यानंतर आपण परत उत्तर तटावरील शूलपाणीच्या घनदाट अरण्यात शिरतो. हे भयानक जंगल पार करून आपण प्रवेश करतो मांडवगड (मांडूगड) परिसरात बाज बहादूर रूपमतीच्या अनेक प्रेमकथा येथे सांगितल्या जातात. येथील अनेक भव्य आणि देखण्या पुराण वास्तू आणि वास्तूंचे अवशेष येथील समृद्ध इतिहासाची जाणीव करून देतात. खरेतर मांडवगड हा स्वतंत्र लेखाचा अथवा लेखकांचा विषय आहे. जहाज महाल, रूपमती महाल रेवाकुंड कितीतरी नावे घ्यावी लागतील.

खरेतर हे एका किल्ल्यात वसवलेले ऐतिहासिक शहर आहे आणि या सर्व गोष्टींचा मथितार्थ एकच की येथे निवांत ५ ते १० दिवस मुक्काम आवश्यक आहे, तरच या ठिकाणाचा योग्य आस्वाद घेणे शक्य होईल.

महेश्वर

नर्मदा मैयाला एक स्वप्न पडले आणि ते १७ व्या शतकात साकार केले पुण्यश्लोक अहिल्याबाईनी खरोखर महेश्वर म्हणजे एक स्वप्न नगरच आहे. येथील भव्य देखणा घाट अत्युत्तम कलाकुसार केलेली मंदिरे यांचे वर्णन करणे शक्य नाही. साक्षात परमेश्वर सुद्धा येथील वास्तव्य सोडुन अन्यत्र जाणार नाही. महेश्वर ही अनुभव घेण्याचीच चीज आहे. येथील घाटावरची संध्याकाळही फार नेत्र सुखद असते. सुंदर घाट व विस्तीर्ण रेवापात्रात सायंकाळी सोडलेले दिवे साक्षात नर्मदेमध्ये चांदण्या नौकाविहाय करताना दिसतात, पूर्वी हे दिवे सोडण्यासाठी पानांचे द्रोण वापरले जात, पण हल्ली सर्रास थर्माकोलचे कोण वापरले जातात आणि सहाजीकच नर्मदेचे प्रदूषण वाढते आहे. येथुन प्रयाण केले नेमावरकडे

मंडलेश्वर

येथे वासुदेवानंद सरस्वती ज्या कुटीत साधना करायचे ती कुटी दर्शनीय आहे. तसेच येथे नर्मदा घाट अतिशय सुंदर आहे. तसेच येथे गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. त्याची आख्यायिका मोठी रोचक आहे. महिष्मती नगरीत आदय श्री शंकराचार्य आणि मंडणमिश्र यांच्यात शास्त्रार्थ चालू होता. मंडणमिश्र यांची पत्नी उभयभारती हिने निर्णयकाराचे पद स्वीकारले होते. ती स्वतः शास्त्रांची फार मोठी जाणकार होती. साक्षात सरस्वतीचेच रूप होती.

ती तीच्या पतीची वादांत हार होऊ लागल्याचे पाहुन ती म्हणाली मंडण मिश्र यांची पत्नी अर्धांगिनी या नात्याने मलाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. शंकराचार्य तयार झाले, शास्त्रार्थाला सुरूवात झाली. वाद रंगू लागला शंकराचार्य वादात हरणे शक्य नाही हे पाहुन उभयभारतीने त्यांना कामशास्त्रांवरील प्रश्न विचारले, ते ऐकुन बाल संन्यासी शंकराचार्य अधोवदन झाले, तेव्हा शंकराचाय तीला म्हणाले मी बालसंन्यासी आहे आम्हाला हा आधिकार नाही म्हणुन परकाया प्रवेश करून मी तुला याची उत्तरे देईन. असे म्हणुन त्यांनी आपल्या शिष्याला पद्यपाद याला सांगितले की नुकताच शिकार करताना मरण पावलेल्या राजा अजरकाच्या कायेत मी प्रवेश करतो, तुम्ही माझा हा देह एखादया गुहेत जतन करून ठेवा, मी उभयभारती यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन परत माझ्या शरीरात प्रवेश करीन तीच ही गुहा या ठिकाणी आहे व तीला गुप्त महादेव मंदिर म्हणतात. राजा अजरकाच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर शंकराचार्यानी वात्सायन लिखित कंदर्पशास्त्राचे भाष्यासहीत अध्ययन केले व महिन्याभराच्या आतच त्यावर ग्रंथ लिहून आपला शिष्य पद्यपाद याच्या हाती उभयभारतीकडे दिला, त्यात तीला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे होती. त्या संतुष्ट झाल्या व त्यांनी शंकराचार्यांचा शास्त्रार्थातील विजय मान्य केला.

नेमावर

नेमावर हे नर्मदेच्या बरोबर मध्यावर येते. याला नर्मदामैयाचे नाभिस्थान मानतात. येथे नर्मदेचे विशाल पात्र उथळ आहे आणि पात्राच्या मधोमध एका छोटया बेटावर नाभी मंदिर आहे. नेमावरमधील सिध्दनाथ मंदिर एक अप्रतिम कोरीव काम असलेले मंदिर आहे.

बर्मनघाट ब्रम्हांड घाट

यानंतर लागतो बर्मनघाट येथील पात्र ही फारच सुंदर असून पैलतीरावरील पांढरीशुभ्र मंदिरे आणि नदीत बनलेल्या बेटावरील गुरुद्‌वारामुळे रेवेच्या सौंदर्यात भरच पडते. आता मुक्काम पडतो जबलपुरात. हे एक पौराणिक तसेच औद‌योगिक शहर आहे. येथेच आहेत सुप्रसिध्द मार्बल रॉक्स आणि धुवाँधार धबधबा. चांदण्या रात्रीचा नौकाविहार ही फक्त इथलीच खासियत. येथील चौसष्ट योगिनी मंदिरे अभ्यासू नजरेनेच अनुभवायला हवे.

अमरकंटक

जंगले आणि घाट ओलांडून आपण पोहचतो मेकल पर्वतावरील पांढरीशुभ मंदिरे आणि जोहिला या नद्यांचे उगमस्थान. एक थंड हवेचे ठिकाण, भाविकांचे श्रध्दास्थान, तर ट्रेकर्ससाठी नंदनवन. कविकुलगुरू कालिदासानेही मेघदुत काव्यात या भागाचे अप्रतिम वर्णन केले आहे. ते म्हणतात, येथील पर्वतराजी मेखलेत (साखळीत) गुंफल्यासारखी दिसते व त्याच्यामधील पदक म्हणजेच मेखलापर्वत. याचाच अपभ्रंश मेकल झाला असावा.

येथील रेवाकुंडात नर्मदा उगम पावते आणि ती माईकाबगीचा येथे गुलबकावली नावाचे फुल उगवते ते अन्य कोठेही नाही. असे येथील लोक सांगतात म्हणुन कुतूहलाने पाहिले तर तो आपला पांढरा सोनटक्का निघाला. येथेच परिक्रमावासी नर्मदापुजन करतात. जवळच शोण आणि भद्र या नद्‌यांचा उगम आणि संगमही आहे. आपण बहुतेक नद्‌यांना स्त्रीलिंगी संबोधतो, पण काही नद (पुल्लिंगी) आहेत. त्याचपैकी एक शोण.

हा नद लगेचच उड्या मारत डोंगर उतरून पूर्वेकडे जातो. येथे एक दंतकथा प्रचलित आहे. मेकलकन्या नर्मदा आणि ब्रम्हदेचपुत्र शोण यांचा विवाह ठरला, पण काही गैरसमजामुळे हा विवाह मोडला व नर्मदा पश्चिमेला वाहू लागली तर शोण पूर्वे ला. येथे छोटेमोठे बरेचसे ट्रेक करता येतात. घनदाट अरण्ये तर सर्वत्रच आहेत. कपिलधारा दूधधारासारखे छोटेखानी धबधबे आहेत विपुल झाडी आणि जलसंदेने समृध्द, शांत परिसर अन्य ठिकाणी अभावानेच आढळेल. येथे हिल स्टेशनचा धिंगाणा अजिबात नाही तरीही कोणत्याही हिल स्टेशनचा तोरा सहज उतरवू शकणारे असे हे ठिकाण असून ट्रेकर्सनी येथे आवर्जून यायला हवे. नक्कीच काहीतरी नवे गवसेल.

होशंगाबाद

दंडोरी महाराजपूर मार्गे आपण येतो हौशंगाबाद येथे. हौशंगाबादला नर्मदेवरील सर्वात मोठा घाट आहे. येथे नर्मदेचे पात्रही विशाल आणि सुंदर आहे. येथे मनमुराद जलकीडा करता येते. पण येथे देशीविदेशी पर्यटकांचा नेहमीच राखता असतो. हे जंगल म्हणजे ट्रेकर्ससाठी नंदनवनच आहे आणि अखेरीस आपण परत येतो. ओंकारेश्वरला येथे परिक्रमेची सांगता होते.

छायाचित्र

  • सर्व
  • पूजन
  • 2
  • 3