नर्मदा माता ही कुमारी होती अशी एक श्रद्धा आहे. नर्मदा परिक्रमा करताना श्रद्धाळू भक्तांना तिने कुमारिका रुपात दर्शन दिल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर कन्यापूजन केले जाते. हे कन्यापूजन करताना परिसरातील ८ वर्षाखालील मुली, बालवाडी, पहिली-दुसरीच्या मुली बोलावून त्यांचे पूजन केले जाते. त्यांना हळद-कुंकू लावून त्या वयोगटातील मुलींना आवडणाऱ्या आणि उपयुक्त वस्तू भेट दिल्या जातात. उदा. रिबिनी, कंगवा, खेळणी, पाटी, रुमाल, टॉवेल, वह्या, पेन, खाद्यपदार्थ इ. त्या वस्तू देताना एकसमान दिल्या जातात. त्यांना नाराज होऊ नये अशी काळजी घेतली जाते. याच बरोबर त्यांना गोडधोड करून जेवण दिले जाते. कन्यापूजन आणि कन्या भोजन हा एक आगळावेगळा आनंददायी सोहळा होतो. कन्यापूजनावेळी त्या मुलींच्या डोळ्यातील भाव, कुतूहल आणि उत्साह डोळे दिपवणारा असतो. त्यावेळी दत्त भगवान व नर्मदा माता इतक्या उपस्थित आहेत असा भास होतो.
नर्मदा मैय्याचे पूजन करण्याची पद्धत आहे. फुले, हळद-कुंकू, अक्षता वाहून तिचे पूजन करणे, ओटी भरणे अशा प्रकारे नर्मदापूजन केले जाते. याच बरोबर नर्मदा नदीमध्ये मनोभावे दिवे सोडले जातात. नदीतील पाण्याच्या लहरींवर असे दिवे तरंगत जाण्याचे दृश्य अत्यंत मनोहर असते.
नर्मदा परिक्रमेमध्ये बऱ्याच ठिकाणी सदावर्त चालते. तेथे अन्नदान, प्रसाद वितरण केले जाते . आपल्यालाही त्यामध्ये सहभागी होता येते. तेथे अन्नदानासाठी धान्यसाहित्य आणि रोख रक्कमेचे सहाय्य देता येऊ शकते.
नर्मदा किनारी कढाई करणे ही पद्धत जुनी आहे. परिक्रमेसाठी भ्रमण करत असताना अनेक परिक्रमार्थी विविध तीर्थक्षेत्रांवर मुक्कामाला येऊन राहिलेले असतात. त्यांच्यासाठी शिरा करून प्रसाद देणे याला कढाई करणे असे म्हणतात. शिऱ्याएवेजी इतर गोड पदार्थ आणि भोजन देणे असेही याचे स्वरूप असते.
नर्मदा परिक्रमेच्या मार्गावर अनेक ठिकाणी नैमित्तिक उपक्रम सुरू असतात. दैनंदिन पूजा, काकड आरती, अभिषेक, सत्यदत्तपूजा, दत्तयाग, गुरुचरित्र, पारायण, प्रदक्षिणा, संगमस्नान इत्यादी अनेक उपक्रम सुरू असतात. त्यामध्येही सहभागी होता येते.